व्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो. आज कोणता खंबा

समाज

व्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. 🍾 ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो. आज कोणता खंबा आणावा ? 🥃🍷 याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची चितळे दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला.


म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन हे. मी येतो की संध्याकाळी.’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’ मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’ ‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो.


मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैशे पायजे होते ? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात? तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.’याची एक पोरगी दोन वर्षांची.
दुसरी तीन महिन्याची. दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्याव तुम्हाला वापस करीन.’त्याच्या उत्तरानी तोंडातली थुंकीच सुकली. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.माझ्या घरातली दारु, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती….निशब्द…- नितीन थोरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *